मीरा -भाईंदर 27- मीरा-भाईंदर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते ८ मार्च (शनिवार) रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना प्रशासकीय आणि न्यायालयीन कामकाजासाठी सातत्याने ठाणे शहरात जावे लागते. शहरातील नागरिकांचे जा -ये करण्याचे चार तास वाचावेत, तसेच अनावश्यक आर्थिक फटका देखील नागरिकांना बसू नये, याचा विचार करून या भागाचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे परिवहन मंत्री श्री . प्रताप सरनाईक यांनी सन २००९ पासून विविध प्रशासकीय व न्यायालयीन कार्यालये मीरा-भाईंदर शहरांमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. याचाच एक भाग म्हणून दिवाणी न्यायालय देखील मीरा -भाईंदर शहरांमध्ये असावे यासाठी ते पाठपुरावा सातत्याने करीत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून गेल्या कित्येक वर्षाच्या मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नातून दिवाणी न्यायालयाचे इमारत मीरा-भाईंदर शहरांमध्ये उभी राहिली आहे.या नुतन इमारतीचे उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. अर्थात, या न्यायालयाच्या निर्मितीमुळे मीरा -भाईंदर शहरातील लाखो नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी ठाणे शहराची पायपीट करावी लागणार नाही, याबाबत समाधान आणि आनंद येथील वकील संघटनेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी देखील व्यक्त केले आहे.
दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी.
दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली. अंतर्गत सजावट व इतर कामे २ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
