ठाणे 07 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवार, ०७ फेब्रुवारी रोजी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे (#DeepCleaningCampaign) आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेची सुरूवात, स. ८.०० वाजता कोपरी गणेश विसर्जन घाट, अष्टविनायक चौक येथून होईल. त्याचवेळी, विविध प्रभाग समिती क्षेत्रात सकाळी ७.०० वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेची तयारी सुरू होणार आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार या मोहिमेत महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मोहिमेचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यास, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी, उपायुुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता (यांत्रिकी) गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते. स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, विभागनिहाय पध्दतीने करण्यात आलेले नियोजन, उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आदी बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
शनिवारी सकाळी ७.०० वाजता या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस (#DeepCleaningCampaign) सुरुवात होणार आहे. प्रभागातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मैदाने, मार्केट परिसर, फूट ओव्हर ब्रीज, सर्व सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात येईल. सिद्धेश्वर तलाव, कोळीवाडा, आनंद नगर, रायलादेवी तलाव परिसर, तानसा पाईपलाईन, कोपरी गाव, ज्ञानसाधना महाविद्यालय परिसर, कळवा पूल, चेंदणी, खोपट एसटी बस स्थानक, बारा बंगला परिसर, मासुंदा तलावपाळी, लोढा स्प्लेंडोरा परिसर, दिवा आणि मुंब्रा या भागात सर्वंकष स्वच्छता केली जाणार आहे.
सर्वंकष स्वच्छता मोहिम राबवित असताना सहाय्यक आयुक्त्, सर्व विभागप्रमुख, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यामध्ये पूर्ण क्षमतेने उपस्थित असतील. आपल्या विभागातील नागरिक सहभागी होतील या दृष्टीने सर्वांना आवाहन करण्यात आले आले.
