खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक भूक भागवणारा महोत्सव
ठाणे, 22 – कोकणातील शेतकरी आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्याना आपल्या हक्काचे दालन मिळावे आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या ठाण्यातील मालवणी महोत्सवाचा सांगता सोहळा रविवारी (ता.१९ जाने,) रोजी पार पडला.या दहा दिवसात तब्बल २५ कोटींची उलाढाल झाली. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी दिली. या महोत्सवाचे हे २६ वे वर्ष होते.
ठाणे पश्चिमेकडील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने १० ते १९ जाने.या कालावधीत राजकीय, सामाजिक तसेच विविध प्रशासकीय मान्यवरांसह लाखो लोकांनी या महोत्सवाला भेट दिली. या मालवणी महोत्सवात दररोज धार्मिक,सात्विक अग्निहोत्र होमासह, सांस्कृतिक मनोरंजन व कोकणी खाद्यसंस्कृतीची चव चाखण्याची आणि कोकणी मेवा खरेदी करण्याची सुवर्णसंधी रसिक खवय्यांनी साधली. शनीशिंगणापुरच्या आनंदवन भेळने तर चांगलाच भाव खाल्ला. त्यामुळे सर्वच स्टॉल धारकांनी बक्कळ व्यवसाय केल्याचे दिसुन आले. पुस्तकांच्या स्टॉलवरही वाचकांची गर्दी उसळली होती.
यंदा प्रथमच मालवणी महोत्सवात कोकणच्या धर्तीवर साकारलेल्या गणपती मंदिराचे विशेष आकर्षण लक्षवेधी ठरले होते. श्री गणेशाचे दर्शन घेऊन अग्निहोत्र विधी करण्याची सुविधा महोत्सवामध्ये उपलब्ध करण्यात आलेली असल्याने शेकडो जणांनी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदवला. मुख्य प्रवेशद्वाराला यंदा मालवणी खाद्य संस्कृतीचे भोक्ते कै. अरुण लोंढे प्रवेशद्वार असे नाव देऊन आयोजकांनी भावनिक ऋणनिर्देश जपल्याचे दिसुन आले. याशिवाय महोत्सवात दररोज होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बच्चे कंपनी आणि महिलांची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात काव्य वाचनाच्या पर्वणी सोबतच एकाच वेळी शारदा प्रकाशनच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लाडक्या बहिणींसाठी यंदा आयोजित केलेल्या राहुल निनाद प्रस्तुत राहुल ढेंगळे आणि निनाद सुतार यांच्या “खेळ रंगला पैठणीचा” स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या अटीतटीच्या स्पर्धेत संगीता गायकवाड प्रथम क्रमांकाची मानकरी ठरून त्यांनी महाराणी पैठणी पटकावली. द्वितीय क्रमांक सीमा जगताप आणि रुचिता देशमुख तृतिय क्रमांकाने विजेत्या ठरल्या.
महोत्सवात भेट देणाऱ्या खवय्यांनी मालवणी चवीच्या कोंबडी-वडे, सागोती आणि चवदार मच्छी तसेच, कोकणातील विविध खाद्यपदार्थांची रेचलेल पाहण्यास मिळाली. कोकणातील विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्याचा आनंद ठाणे तसेच मुंबईकरांनी मनमुराद लुटला. मालवणी महोत्सवातील आकर्षक विद्युत रोषणाईच्या सेल्फी पॉईंटवर तर फोटो काढण्यासाठी तुडुंब गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी उद्घाटन केलेल्या या मालवणी महोत्सवाची सांगता भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.
* मालवणी महोत्सवाला मान्यवरांची मांदियाळी…
ठाण्यातील मालवणी महोत्सवास मान्यवरांची मांदियाळी होती. यात माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ.निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, सुरेश कोलते तसेच आभिनेते अभिजीत चव्हाण आणि ठाणे मनपाचे अधिकारी – कर्मचारी तसेच ठाणे व मुंबईचे जिल्हा उपनिबंधक आदी मान्यवरांचा समावेश होता. महोत्सवातील प्रसन्न वातावरणाने हे सर्व मान्यवर सुखावले.
