Monday, December 22 2025 11:41 am
latest

मनसेच्या अविनाश जाधवांचे ठाणेकरांना साकडे

ठाणे स्थानकात हटके प्रचार – एकदा संधी देण्याचे केले आर्जव

ठाणे, १२ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकात हटके प्रचार केला. “ठाणेकरांनो एकदा मला संधी द्या ! अशा आशयाचे फलक हाती घेऊन अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना साकडे घातले. यावेळी रेल्वे प्रवाश्यांशी संवाद साधुन अविनाश जाधव यांनी रेल्वे संदर्भात समस्या जाणुन घेतल्या. दरम्यान, अविनाश जाधव यांच्या हटके प्रचाराची रेल्वे प्रवाशांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे
भारतात पहिली रेल्वे बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे स्थानकादरम्यान धावली. अशा या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करतात. ठाणे स्थानकाचा पश्चिमेकडील भाग ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात येत असल्याने स्टेशन परिसर ते नौपाडा, जुने ठाणे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरात मुबलक पार्किंग सुविधांसह या भागाचा सुनियोजित विकास होणे गरजेचे असल्याचे मत प्रवाश्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यावर अविनाश जाधव यांनी “एकदा मला संधी द्या” असे नम्र आवाहन ठाणेकरांना केले.

चाकरमान्यांमध्ये अविनाश जाधव यांची क्रेझ

आज सकाळी प्रचार करताना रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये अविनाश जाधव यांची क्रेझ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे तरुणांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. यावेळी महिला,तरुण वर्गाला जाधव यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला नाही. तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.

विविध समस्यांचा उहापोह

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १ व २ समोरील सॅटीस पुलाखाली अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रवाशांसोबत संवाद साधला. याप्रसंगी, मनसेचे नेते अभिजित पानसे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, ठाणे महिला अध्यक्षा समिक्षा मार्कंडे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावेळी प्रवाश्यांनी ठाणे प्रादेशीक मनोरुग्णालय येथील नविन विस्तारीत रेल्वे स्थानक, स्थानकातील दिवसेंदिवस वाढती गर्दी, रेल्वे पादचारी पूल, वारंवार बंद पडणारे सरकते जिने, रेल्वे दुर्घटना अशा विविध समस्यांचा उहापोह केला.