Monday, December 22 2025 11:10 am
latest

डायघरवासियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

ठाणे, 13 :-कल्याण तालुक्यातील डायघर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. याविषयी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते. मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह तेथील नागरिकांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित केले होते.
या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कल्याण तहसिलदार सचिन शेजाळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, डायघरवासिय उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी तेथील समस्यांचा पाढाच वाचला. बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी अन् त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्या याबाबतीतील होत्या. यावर जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे सूचित केले. तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा, त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय येथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली. ही मागणी तात्काळ मान्य करीत ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी तेथे कृत्रिम तलावाची लगेचच उभारणी करण्यात येईल, असे आश्वासित केले.
शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी डायघरवासियांसाठी तातडीने घेतलेल्या या बैठकीबद्दल आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी आभार मानले.