ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन
१३ ते १५ ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना यांच्यावर राष्ट्रध्वज फडकणार
ठाणे, 11 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. त्यात ठाणेकरांनी उस्त्फूर्तपणे सहभागी व्हावे. आपल्याकडील राष्ट्रध्वज १३ ते १५ ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना यांच्यावर फडकवावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचा आरंभ ०९ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झाला. या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांवर तिरंगी रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावेत यासाठी त्याची उपलब्धता राहील, यावरही भर देण्यात येणार आहे.
०९ ते १५ ऑगस्ट या काळात, तिरंगा यात्रा, तिरंगा वाहन रॅली, तिरंगा मॅरेथॉन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, स्वाक्षरी मोहिमेसाठी तिरंगा कॅनव्हास महत्त्वाच्या ठिकाणी उभारणे, नागरिकांनी तिरंगा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहन देणे, स्वातंत्र्यसैनिक, शहीदांचे कुटुंबिय यांचा सन्मान करणारा तिरंगा ट्रीब्यूट कार्यक्रम आयोजित करणे याचाही यात समावेश आहे. बचत गट आणि उद्योजकांच्या मदतीने तिरंगा मेळ्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे.
१३ ते १५ ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना राष्ट्रध्वज फडकावून, जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानात सहभागी व्हावे आणि गत दोन वर्षांप्रमाणेच या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
