Monday, December 22 2025 7:20 am
latest

यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई 26 : यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याविषयक तक्रारी दूर करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा योजनेअंतर्गत लाभाचे वितरण करावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

यवतमाळ जिल्ह्यासह आर्णी, घाटंजी व पांढरकवडा तालुक्यातील पीक विमा योजनेतील तक्रारींबाबत आमदार संदीप धुर्वे यांच्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

सन 2023-24 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये 3.66 लाख शेतकऱ्यांनी सह‌भाग नोंदविला होता. माहे जुलै ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी/अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पूर्व सूचना नोंदविल्या होत्या. परंतू पीक विमा कंपनीने 306050 सूचना अपात्र केल्या, अशा तक्रारी होत्या. तसेच आर्णी, घाटंजी व पांढरकवडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अपात्र करून अल्प प्रमाणात रक्कम वाटप केल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या बैठकीस कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याविषयक तक्रारी दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्वरीत पीक विमा योजनेअंतर्गत लाभाचे वितरण करावे, असे ही निर्देश कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी दिले.