Monday, December 22 2025 2:04 pm
latest

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांमध्ये मदत कक्ष सुरू

अर्ज, नोंदणी प्रक्रियेसाठी महापालिकेची विनामूल्य मदत

ठाणे, १२ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू झाली आहे. ही योजना सर्वदूर पोहोचावी आणि जास्तीतजास्त महिलांनी यांचा लाभ घ्यावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीस्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची कार्यवाही सुनियोजित व गतीमान रितीने व्हावी याकरिता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी यांची संयुक्त बैठक नुकतीच नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी कर्मचारी यांना मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये अशाप्रकारे काम करावयाचे असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार प्रभाग समितीस्तरावर तयार करण्यात आलेल्या मदत कक्षामध्ये अर्ज वितरण व स्व‍िकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून अंगणवाडी मदतनीस व सेविका यांच्या माध्यमातून ऑनलाईन ॲपमध्ये अपलोड करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपायुक्त (समाज विकास विभाग) अनघा कदम यांनी दिली.

कार्यशाळांचे आयोजन

या योजनेचा लाभ ठाणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मिळाला यासाठी महिला बचत गटासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत महिलांना या योजनेची संपूर्ण माहिती तसेच अर्ज भरणे व त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची माहिती देण्यात आली. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, महिलांच्या व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळावी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेतील पात्र महिलेस डिबीटी तत्वावर दरमहा रक्कम १५०० रुपये ही आधार लिंक केलेल्या खात्यात प्राप्त होणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु. १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. सदर योजनेचा सर्व पात्र गरजू महिलांना लाभ देण्यासोबत अर्ज भरतांना महिलांना सुलभ होईल अशी व्यवस्था प्रत्येक प्रभाग समिती व मदत सेवा केंद्रामध्ये होईल. जास्तीत जास्त गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.