ठाणे, 20 – ठाणे जिल्ह्यात जागतिक सिकलसेल जागरूकता दिवसानिमित्त जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय सोहळा आरोग्य विभागाकडून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सकाळी 11 वाजता पार पडणार पडला. 0 ते 40 वयोगटातील 200 रुग्णांची तपासणी आज करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय भागात प्रभात फेरी, व्हिडीओ व पोस्टरमार्फत जनजागृती करण्यात आली.
अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मिलिंद म्हैसकर (भा.प्र.से) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सिकलसेल या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना माहिती देण्यासाठी त्यांचे उपचार करून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळे आरोग्य विभागाने नेहमी सज्ज राहून काम करावे असे मार्गदर्शन मिलिंद म्हैसकर यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण आरोग्य केंद्र, वर्धीणी उपकेंद्रांवर देखील सिकलसेल जागरूकता दिवस रुग्णाची तपासणी करून व जनजागृती करून साजरा करण्यात आला.
ग्रस्तांना नियमित तपासण्या, रक्त संक्रमण, औषधोपचार, इ. मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सिकलसेल वाहक व पीडीत व्यक्तीने दुसऱ्या वाहक व पीडीत व्यक्तीशी विवाह टाळावा यासाठी समुपदेशन व्हिडीयो मार्फत करण्यात आले.
यावेळी आयुक्त आरोग्य सेवा अमगोथू श्रीरंगा नायक (भा.प्र.से), अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाडे, सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य श्री. नवीन सोना (भा.प्र.से), आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई श्री. रमेश चव्हाण (भा.प्र.से), सहसंचालक, उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे डॉ. अशोक नांदापूरकर, सहायक संचालक (हिवताप) डॉ. बाळासाहेब सोनावणे, अतिरिक्त उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे डॉ. चाकुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, सहाय्यक संचालक अदिवासी विभाग तेजस्वीनी गलाडे, वैद्यकिय अधिक्षक मनोरुग्णालय ठाणे डॉ. मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाच रुग्णांना रेड कार्ड वाटप करण्यात आले असून त्यांनी योग्य उपचार घ्यावे यासाठी मार्गदर्शन करून औषध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. रुग्णांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा सामान्य रुग्णालया मार्फत मिळणाऱ्या सेवेबाबत आभार व्यक्त केले.
