लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात शनिवारी झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम
महापालिका शाळा क्रमांक १२० च्या आवारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग
ठाणे ( ११) : ठाणे महापालिका क्षेत्रात दर शनिवारी राबविण्यात येत असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेमधील नागरिकांचा सहभाग वाढतो आहे. स्वच्छतेबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.
शनिवारी लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात
सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत, पुढील सोमवारी, २० मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आयुक्त सौरभ राव, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिका शाळा क्रमांक १२०चे प्रांगण स्वच्छ करण्यात सहभाग घेतला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या ज्या वास्तू मध्ये मतदान केंद्र आहे त्या सर्व वास्तू, त्यांचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या आहेत.
शाळेच्या प्रांगणात, समता नगर हजेरी शेडवरील कार्येरत असलेले ज्येष्ठ सफाई कर्मचारी श्रीराम भगवंत कदम यांचा आयुक्त राव यांच्या हस्ते शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शनिवारी सकाळी ७.०० वाजता लोकमत नगर प्रभाग समितो क्षेत्रात सफाई मोहिमेस आरंभ झाला. इंदिरा नगर नाका ते लोकमान्य नगर डेपो, मराठा ते राजीव हॉटेल, दालमिल नाका ते इंदिरानगर नाका, शाळा क्रमांक १२० ते रवेची माता मंदिर रोड या परिसरात मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते येथे सफाई मोहीम झाली.
नालेसफाईची पाहणी
मोहिमेदरम्यान आयुक्त राव यांनी नाले सफाईची पाहणी केली. इंदिरा नगर, दत्तमंदिर परिसरातील नाले, वस्ती येथे आयुक्त राव यांनी पाहणी केली. नाल्यातून बाहेर काढलेला कचरा तातडीने उचलला जावा, औषध फवारणी करावी, अशा सूचना आयुक्तांनी या पाहणी दरम्यान दिल्या.
या पाहणीत, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
