महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा
सुट्टीसाठी बाहेर न जाता सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे
-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे, 01 : ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस सुट्टी आहे. मात्र सुट्टीसाठी बाहेर न जाता आपण सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा 64 वा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज समस्त ठाणेवासियांना केले.
महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) श्री. संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री.विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, डॉ. श्रीकांत परोपकारी, डॉ. विनयकुमार राठोड, रुपाली अंबुरे, पराग मनेरे, शिवराज पाटील, शशिकांत बोराटे, अमरसिंह जाधव, सचिन गोरे, सुधाकर पठारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, ठाणे ग्रामीण पोलीसच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे-घाडगे, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, विकास गजरे, सर्जेराव म्हस्के पाटील, उर्मिला पाटील, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी ज्योती कांबळे, धनंजय बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) कार्यकारी अभियंता संजय पुजारी, उपअभियंता श्री. र.मा.सूर्यवंशी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार संजय भोसले, उमेश पाटील, रेवण लेंभे, आसावरी संसारे, राहुल सारंग, मिलिंद मुंडे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, राहुल सूर्यवंशी, गोरख फडतरे, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करुन उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आणि समस्त ठाणेवासियांना महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या महाराष्ट्र राज्याला वैभवशाली इतिहास, शौर्य आणि त्यागाची परंपरा व समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. या चळवळीत सर्व मराठी भाषिक सहभागी झाले होते. त्यामध्ये 105 हून अधिक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते.
आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राज्याच्या समृद्ध इतिहासाचे, संस्कृतीचे आणि महाराष्ट्र धर्माचे प्रतिक म्हणून आजच्या या मंगलमय दिवसाकडे पाहता येईल. महाराष्ट्र दिन हा राज्यातील लोकांना एकत्र येण्याचा व त्यातून आपली संस्कृती, समृद्ध वारसा, प्रगतीचा आलेख मांडण्याचा दिवस आहे. राज्य निर्मितीचा वर्धापन दिन साजरा करताना या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन करुन ते पुढे म्हणाले, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे. या दिनामुळे श्रमाची प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे.
श्री. शिनगारे पुढे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे. एकीकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, मिराभाईंदर शहरासारखा शहरीकरण झालेला भाग तर दुसरीकडे शहापूर, मुरबाड सारखा आदिवासी भाग आहे. या दोन्ही भागातील विकासाच्या गरजा भिन्न असल्या तरी त्यामध्ये समतोल साधण्याचे आव्हान पेलून ठाणे जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वेगाने प्रगतीथावर आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन सुधारण्यासाठी शाळा ते आदर्श शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तसेच ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट आरोग्य केंद्रामध्ये परिवर्तन करण्याचे अभियान सुरू आहे. या अंतर्गत आरोग्य सुविधा अद्ययावत करणे, डिजिटल सुविधा पुरविणे, सुशोभिकरण करणे, वैद्यकीय साधन सामुग्री उपलब्ध करून देणे आदी कामेही सुरू आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत अंगणवाडी या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य, ई लर्निंग, एलईडी टीव्ही, मुलांसाठी टेबल खुर्च्या, स्वच्छ पाणी, इमारतीची रंगरंगोटी, सुशोभीकरण, शौचालय दुरुस्ती अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे.
आपल्या भाषणात मतदारांना आवाहन करताना श्री. शिनगारे पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. अशा या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेतील मोठा उत्सव लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने सध्या देशभर सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. लोकशाहीच्या या महाउत्सवात ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी, नवमतदार, महिला, दिव्यांग मतदारांनी या उत्सवात आवर्जून सहभागी व्हावे व मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. आपले एक मत हे लोकशाहीचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस सुट्टी आहे. सुट्टीसाठी बाहेर न जाता आपण सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे, असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना तसेच समस्त ठाणेवासियांना शेवटी केले.
ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केले. तसेच याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त अनिल घेरडीकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांचे दिमाखदार संचलन पार पडले.
याप्रसंगी मे. महानगर टेलिफोन निगम लि. ठाणे चे सुरक्षा रक्षक श्री. प्रल्हाद गोपाल तारी यांनी एमटीएनएल केबलची चोरी वाचविण्यात मोठी भूमिका बजावून चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचप्रमाणे मे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग वागळे इस्टेट, ठाणे चे सुरक्षा रक्षक श्री. हनुमंत य.अडसुळे यांनी वागळे इस्टेट येथील लागलेल्या आगीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळविले. या दोघांच्याही या विशेष कामगिरीबाबत त्यांना जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेवून त्यांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन डॉ. तरुलता धनके यांनी केले.
