Monday, December 22 2025 2:54 pm
latest

हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण नाईक तांड्याला सुधारित योजनेनुसार पाणी पुरवठा करू – पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 15: जल जीवन मिशन अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण नाईक तांड्याला पूर्वीच्या योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत होता. परंतु नव्या जल जीवन मिशन अंतर्गत साखरा येथून पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, या तांड्यापर्यंत ६ किलोमीटरचे अंतर आणि चढ लक्षात घेता पाईपलाईनद्वारे योग्य दाबाने पाणी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे केवळ ३ किलोमीटर अंतरावरील नव्या स्रोतावर आधारित सुधारित योजना तयार केली असून, ती याच आठवड्यात मंजूर करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली

यासंदर्भात सदस्य डॉ. प्रज्ञा सातव, हेमंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी उत्तर दिले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, लक्ष्मण नाईक तांडा, साखरा आणि कवठा यांसह नऊ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या कार्यान्वित करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेनंतर ‘हर घर नल, नल से जल’ हे उद्दिष्ट पूर्ण होईल.

योजनांच्या पाणी पुरवठा योजनेत उखडलेल्या रस्त्यांविषयी विचारणा करण्यात आली असता, राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, सर्व पाइपलाईन टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर करारानुसार उखडलेले रस्ते पुनःस्थापन करण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण होताच रस्त्याची कामे केली जाईल.

राज्यमंत्री यांनी असेही सांगितले की, ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून, २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्राकडून निधीच्या दिरंगाईमुळे काही अडथळे आले असले तरी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

‘हर घर जल, नल से जल’ ही योजना प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचेपर्यंत चालू राहणार आहे. हिंगोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये जलजीवन मिशनमुळे मोठा बदल घडणार असून, शासन यास प्राधान्याने हाताळत असल्याचेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.