ठाणे, 02 — मतदानाने लोकशाही बळकट होते, त्यामुळे प्रत्येकाने आपला लोकशाहीचा अधिकार बजावून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करा असा संदेश आयटीआय सर्कल येथे करण्यात आलेल्या मतदान जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला.
स्वीप उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेतील विविध प्रभागांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. स्वीपच्या नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविले जात आहेत.
ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. 23, 102, 126 व शाळा क्र. 32 मधील विद्यार्थ्यांनी आयटीआय सर्कल येथे मतदानाबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमांतर्गत पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील सहभाग आणि निर्भय मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली. तसेच मतदानासंदर्भात विविध घोषणा देत प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. या स्वीप उपक्रमामुळे तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण होऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली.
