Monday, December 22 2025 8:47 am
latest

स्थावर मालमत्ता विभागाची श्वेत पत्रिका काढा-आमदार संजय केळकर

प्रकल्पबाधित कुटुंबांच्या
घरांसाठी कृती आराखडा…

* अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे घरांपासून वंचित

ठाणे, 11 – शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेली कुटुंबे वर्षानुवर्षे पुनर्वसन न झाल्याने घरांपासून वंचित आहेत. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेत पत्रिका काढण्याची मागणीही श्री.केळकर यांनी केली.

ठाणे शहरात अनेक प्रकल्पांतर्गत शेकडो कुटुंबांची घरे बाधित झाली असून अनेकांचे पुनर्वसन वर्तकनगर, मानपाडा, राबोडी आदी भागात रेंटल इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. तर शेकडो कुटुंबे आजही घरांसाठी वणवण करत आहेत. या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. श्री.केळकर यांनी तातडीने आज शासकीय विश्रामगृहात स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि या कुटुंबांची बैठक घेतली. यावेळी २४ वर्षे घरांपासून वंचित असलेले सॅटीसबाधित ५८ कुटुंबे आणि आठ वर्षांपासून वणवण करणारी हॅप्पी व्हॅली येथील १८ कुटुंबे तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण, स्थावर मालमत्ता विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले असून त्या दिशेने काम सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. या निर्णयामुळे अनेक वर्षे घरांपासून वंचित असलेल्या या कुटुंबांची वणवण संपणार असून या रहिवाशांनी श्री.केळकर यांचे आभार मानले आहेत.