आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सायंकाळी केली सी पी टॅंकची पाहणी
ठाणे, 13 – : सी पी टॅंक येथे साठलेला कचरा उचलून वागळे इस्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. सोमवारी सायंकाळी आयुक्त सौरभ राव यांनी सी पी टॅंकला भेट देऊन कामाची पाहणी केली.
त्याचवेळी, या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
वागळे इस्टेट येथील सी पी टॅंक येथील साठलेला कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते. कचरा उचलण्याची गती आणि त्याची वाहतूक याविषयी डॉ. शिंदे यांनी माहिती दिली.
स्थानिक नागरिकांनीही यावेळी आयुक्त राव यांची भेट घेवून कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
