Monday, December 22 2025 9:32 pm
latest

सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 16: राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. तसेच गुन्हे सिद्धता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. राज्यात सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी गृह विभागामार्फत विशिष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरेच्या तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य रवी शेठ पाटील यांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दुरुस्ती संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रशांत बंब, भास्कर जाधव, प्रशांत ठाकूर, महेश शिंदे आणि श्रीमती श्रीजया चव्हाण यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक शहरात व अन्य ठिकाणी पोलीस विभाग, जिल्हा नियोजन समिती तसेच सीएसआर फंडातून आवश्यकतेनुसार बसवण्यात येतात. या सीसीटीव्हींच्या देखभाल दुरुस्ती आणि सनियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या कार्यक्रमालेमध्ये सीसीटीव्ही वॉरंटी कालावधी, देखभाल व दुरुस्तीची स्पष्ट जबाबदारी, फायबर कनेक्टिव्हिटीतील अडथळे, तसेच पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमधील समन्वय यांचा समावेश असेल.

या प्रश्नाच्या उत्तरात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितले, रत्नागिरी येथील बंद सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येत असून या संदर्भात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात आली आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याच्या सूचना पोलीस विभागामार्फत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रायगड येथील बंद असलेले शेती सीसीटीव्ही कॅमेरे सूरू करणे संदर्भात एक बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.