Wednesday, October 28 2026 7:40 pm

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’; महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ, पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभिनंदन केले.

द वीक मॅगेझीन तर्फे ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रधानमंत्री संग्रहालय व ग्रंथालय नवी दिल्ली येथे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता, या समारंभात केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने, अधिक्षक अभियंता संजय पाटील, ॲक्वाटिक टूरझिमच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड’ अंतर्गत मिळालेला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ हा सन्मान महाराष्ट्राच्या पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीयस्तरावर गौरव मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. ‘आयएनएस गुलदार’ हा प्रकल्प पर्यटनाच्या पारंपरिक संकल्पनेपलीकडे जाऊन आधुनिक पर्यटन अनुभव यांची सांगड घालणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवी दिशा मिळेल. हा पुरस्कार मिळविण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

राज्यात दर्जेदार, शाश्वत पर्यटन विकास : सचिव संजय यादव

पर्यटन सचिव संजय यादव म्हणाले, “ ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला मिळालेला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ हा महाराष्ट्राच्या नाविन्यपूर्ण पर्यटन विकासाच्या प्रयत्नांचा गौरव आहे. सागरी वारशाचे संवर्धन, पर्यावरणपूरक पर्यटन आणि पर्यटकांना अनोखा अनुभव देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार महत्वाचा आहे.राज्यात दर्जेदार, शाश्वत आणि जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेणारे पर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

‘आयएनएस गुलदार’ वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प : व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आयएनएस गुलदार’ या नौकेचे पर्यटनाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे.या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्यासोबतच स्थानिक पर्यटन व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे.

एक्स-आयएनएस गुलदार वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प

पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार हा देशातील अत्यंत महत्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातंर्गत, ‘स्पेशल असिस्टंस टू स्टेटस फॉर कॅपीटल इन्हव्हेस्टमेंट डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू ग्लोबल स्केल’ या योजनेअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाव्दारे विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ४६.९१ कोटी तर महाराष्ट्र शासनाने ₹११२.४६ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे.

एक्स-आयएनएस गुलदार ही भारतीय नौदलातील ‘मगर’ वर्गातील लँडिंग शिप टँक प्रकारातील युद्धनौका असून ही नौका तब्बल ३९ वर्षे राष्ट्रसेवा बजावून १२ जानेवारी २०२४ रोजी भारतीय नौदलामधून निवृत्त झाली.ही नौका मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या माध्यमातून १९ मे २०२६ रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे २२ मीटर खोलीवर समुद्रतळावर ठेवण्यात आली. एक्स-आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभिंत्ती म्हणून कार्य करणार असून त्यामुळे समुद्री जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे.जेट्टीवरुन स्पीडबोट व्दारे निवती रॉक येथे पोहोचून व तेथील बार्जवर उतरुन पाणबुडी किंवा स्कूबाव्दारे जहाजामधील प्रवाळ व मत्स्य पाहणी पर्यटकांना करता येणार आहे. यामध्ये व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (१२ मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (१८ मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (३० मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कन आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.