शहापूर, 23- शहापूर तालुक्यातील शेद्रुण या गावात व्यवस्थित स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावरच संस्कार करावे लागत आहेत. आता पावसाळ्यात तर वर ताडपत्री पकडून खाली मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कार्यसम्राट लोकप्रतिनिधी करतात काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. शेद्रुण गावातील दौलत पांडुरंग भगत यांचं मंगळवारी 17 जून रोजी रात्रीच्या सुमारास आजारानं निधन झालं. शेद्रुण गावात अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य आणि व्यवस्थित स्मशानभूमी नसल्यामुळे बाजूलाच माळरानावर उघड्यावर दहन केले जाते. मात्र आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सरणावर चक्क ताडपत्री धरून मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यात आले. या ठिकाणी स्मशानभूमी मंजूर करण्यात आली होती, मात्र अंतर्गत वादामुळे झाली नसल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितलं.
तालुक्यात 407 महसूल गावांसह गावपाड्यावर स्मशानभूमी आहेत. मात्र या ठिकाणी पाणी, वीज, रस्ता या सुविधांचा अभाव असल्याचं नगरपंचायत प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. पाण्याची सोय केवळ 59 ठिकाणी आहे, तर 654 ठिकाणी पाण्याची सोय नाही. तसंच 85 ठिकाणी वीजपुरवठा आहे. मात्र 680 ठिकाणी अद्यापही वीजपुरठा नसल्यानं गावकऱ्यांना दिवाबत्तीत अंतिम संस्कार करावे लागतात. तर केवळ 31 ठिकाणी संरक्षण भिंती आहेत, तर 681 ठिकाणी नसल्याचं समोर आलं आहे. तरी 229 गावपाड्यावर स्मशानभूमी मोडकळीस आल्या आहेत. मात्र 231 गावपाड्यावर स्मशानभूमी सुस्थितीत आहेत.
“अनेक गावात रस्ताच नसल्यानं पावसाळ्याच्या दिवसात मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नदी-ओढ्याच्या प्रवाहातून स्मशानपर्यंत घेऊन जावी लागते. मात्र अद्यापही या मागणीकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे.” याबाबत नगरपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कार्यालयात नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं संर्पक होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ही गावं आहेत, त्यामुळे त्यांनी आता तरी या समस्येकडं गांभीर्यानं पाहून सुविधा द्याव्यात अशी मागणी होत आहे.
