मुंबई, 16 : मुंबईसारख्या महानगरात उंच शाळा इमारती, हॉटेल्स, गर्दीच्या बाजारपेठा यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहेत. कुर्ला पश्चिम येथील ‘रंगून जायका’ हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील शाळा इमारतींसह सर्व आस्थापनांची फायर ऑडिट तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.
या प्रकरणी विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत विधानसभा सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.
कुर्ला पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ‘रंगून जायका’ हॉटेलला लागलेली आग हॉटेलमधील सदोष वीज प्रणालीमुळे लागल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. या हॉटेलकडे कोणताही आरोग्य परवाना, अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र किंवा व्यापार परवाना नव्हता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे.
महानगरपालिकेने अनधिकृत उपहारगृहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ स्थापन केले असून, या कक्षामार्फत उपहारगृहांची तपासणी केली जाते. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या आस्थापनांचा इंधन साठा जप्त करणे तसेच इंधन पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही केली जाते, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सभागृहात सांगितले.
