Monday, December 22 2025 3:07 am
latest

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन

मुंबई, 17 जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी प्रथमच मुंबईकरांना मिळणार आहे. प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावर प्रदर्शन दालनांमध्ये हे प्रदर्शन दिनांक १८ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते ७ या वेळेत रसिकांसाठी खुले असेल.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यात प्रदर्शनासाठी प्रथमच श्री. पटनाईक यांना निमंत्रित करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अद्वितीय कलेचा अनुभव लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ओडिशा येथील समुद्र किनाऱ्यांवर वाळूच्या माध्यमातून कलाकृती साकार करणारे सुदर्शन पटनाईक हे त्यांच्या अनोख्या वाळूशिल्पांमुळे जगविख्यात झाले आहेत. समुद्रकिनारी वाळूपासून ते अतिशय कलात्मक शिल्प तयार करत असून त्यांची अनेक वाळूशिल्पे ही सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारी तसेच जनजागृती करणारी असतात.

श्री.पटनायक यांनी आजपर्यंत ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पद्मश्री (२०१४), गोल्डन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२४) आणि युनायटेड किंग्डममधील फ्रेड डॅरिंग्टन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२५) यांसारख्या अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांची कलायात्रा गौरवली गेली आहे.

अलीकडील काळात त्यांनी मिश्र-माध्यमातील कलाकृतींमध्ये उल्लेखनीय प्रयोग केले आहेत. गोल्डन सॅण्ड आर्ट इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे ते नव्या पिढीतील कलाकार घडवत आहेत.