Monday, December 22 2025 6:55 am
latest

विद्यार्थी हितासाठी शाळा बंद आंदोलन मागे घेण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

ठाणे 30 : शिक्षण हक्क अधिनियम २००९अन्वये कोणत्याही संस्थेस अथवा शाळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभूत शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही. तसेच, अनधिकृत शाळांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन कसोशीने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे, आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता आपण आपले आंदोलन कृपया तात्काळ मागे घ्यावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती इंडिपेंडेंट स्कूल संघटनेस केली आहे.

ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी इंडिपेंडेंट स्कूल संघटनेस या संदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात, शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा बाबतीत प्राधान्याने व सातत्याने केलेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे.

१. जनजागृती : अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये यासाठी व्यापक जनजागृतीकरिता अनधिकृत शाळांची यादी यापूर्वी दि.28/03/2023,दि.11/07/2024 व दि.20/07/2024 रोजी स्थानिक वृत्तपत्रामध्ये व संबंधित शाळांच्या दर्शनी बाजूला फ्लेक्सव्दारे प्रसिध्द करण्यात आले होते. तसेच पुनश्च दि. 28/01/2025 व दि.25/04/2025 रोजी स्थानिक वृत्तपत्रात सद्यस्थितीत असलेल्या 81 अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द केली आहे. तसेच सदर शाळांची यादी जाहिरात फलकाद्वारेही प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. प्रशासकीय कारवाई :- अनधिकृत शाळांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत. यानुसार व उपरोक्त कायदेशीर तरतुदीनुसार सदर अनाधिकृत शाळांना दंड आकारणी करण्यात आलेली आहे. दि. 03/01/2025 व दि.25/04/2025 रोजी मालमत्ता कर विभागास दंड वसूली करणेबाबत पत्र दिले आहे. सदर अनधिकृत शाळांना आकारलेल्या दंडाची वसूली मालमत्ता कराची थकबाकी वसूलीप्रमाणे मालमत्ता कर विभागामार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभागामार्फत सदर शाळांच्या अनधिकृत इमारतीचा पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार 32 शाळांचा पाणी पुरवठा बंद केल्याचा अहवाल प्राप्त आहे. तसेच सदर अनधिकृत शाळांच्या इमारती अनधिकृत आहेत अगर कसे याबाबत तपासणी करुन अनधिकृत इमारतीवर नियमोचित कार्यवाही करणेबाबत अतिक्रमण विभागास दि.03/01/2025 व दि. 30/04/2025 रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे व त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

३. फौजदारी कारवाई :- अनधिकृत शाळांवरती शासन निर्देशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले
आहे.

४. मा. उच्च न्यायालय संदर्भ :- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संघटना (MESTA) व अन्य राजकीय पक्ष, संघटना अनधिकृत शाळा बंद करणेबाबत वारंवार पाठपुरावा करत असून MESTA संघटनानी मा.उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्र.16432/2024 दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने दि.30/01/2025 रोजी मा.उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सदर अनधिकृत शाळांमध्ये एकही विद्यार्थ्यांचा प्रवेश न करण्याबाबत पुनश्च: नोटीसेस बजावण्यात आल्या आहेत.

५. विद्यार्थ्यांचे समायोजन – ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 81 अनधिकृत शाळा असून विद्यार्थी पटसंख्या 19,708 आहे. अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन अधिकृत शाळेत करण्यासाठी सर्व मान्यता प्राप्त शाळा व्यवस्थापनाची सहविचार सभा वेळोवेळी घेण्यात आल्या. सदर विद्यार्थ्यांचे समायोजनाबाबत या मान्यता प्राप्त शाळेंनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याचे मान्य केले आहे.

ठामपा शिवि जा.क्र.5403/25 दि. 17/03/2025 च्या पत्रान्वये अनाधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करुन येत्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या पाल्यांचा प्रवेश नजिकच्या मान्यता प्राप्त शाळेमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याकरीता 9 पथके गठित केली आहे. सदर पथकावर शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांचे अन्यत्र मान्यता प्राप्त शाळांत समायोजन करणेबाबत सक्त निर्देश देण्यात आले आहे व याचा नियमित पाठपुरावाही सुरु आहे. तसेच 3 अनधिकृत शाळा कायमस्वरुपी बंद झालेल्या आहेत.