ठाणे,15:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मतदारांमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मतदान जनजागृती रॅली, कार्यशाळा, पथनाट्य आणि विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे.याच उपक्रमाचा भाग म्हणून दसरा विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून महागिरी कोळीवाडा येथे नागरिकांसोबत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
विजयादशमीच्या निमित्ताने ठाणे शहरात ठिकठिकाणी रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली आहेत. महागिरी कोळीवाडा येथे देखील रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक स्थानिक नागरिकांनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती. या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवावी, याविषयी स्वीप टीम कडून माहिती देण्यात आली.
या माध्यमातून आपले मत, आपली ताकद, आपला अधिकार, आपले कर्तव्य मतदान ही संकल्पना उपस्थित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली तसेच नवमतदारांनी नुसते नाव नोंदवून भागणार नाही तर त्यांनी प्रत्यक्ष मतदान करणेही अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्याला जे मत द्यायचे आहे ते कोणत्याही दबावाला, प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मत दिलं पाहिजे, असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थित नागरिकांना केले.
