Wednesday, October 28 2026 8:20 pm

वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा : महापालिकेचे आवाहन

सर्व्हिस सेंटरमधील वाहन धुण्याच्या कामावर निर्बंध

ठाणे, 28 : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार,31 ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने तसेच इतर वाहनांच्या धुण्याच्या कामावर महापालिकेमार्फत निर्बंध घालण्यात आले आहेत.

नागरिकांनी आपल्या सर्व्हिस सेंटर अथवा गॅरेजमध्ये वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी, कूपनलिका किंवा विहिरीतील पाण्याचा वापर करू नये. तसेच वाहन धुण्यासाठी प्रेशर जेटचाही वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, बकेटमध्ये पाणी घेऊन ओल्या कपड्याने वाहने स्वच्छ करण्यास बंदी घालण्यात आलेली नाही.

वरील आदेशांचे उल्लंघन झाल्यास सर्व्हिस स्टेशनवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.