Monday, November 3 2025 8:28 am

वाढदिवसाचे होर्डिंग्ज-बॅनर नको, गरजू विद्यार्थ्यांना मदत करा – आमदार संजय केळकर यांचे विनम्र आवाहन..

ठाणे, 07 – ९ जुलै रोजी आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डींग्ज, फलक, बॅनर न लावता त्या पैशांतून गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे विनम्र आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.

आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस शुभेच्छांचे होर्डींग्ज आणि बॅनर न लावता ठाणे शहरात लोकहिताचे अनेक उपक्रम राबवून सेवा दिवस म्हणून साजरा होत असतो. शहरात, प्रभागात झालेल्या विकासकामाची, योजनांची, उपक्रमांची माहिती फलक, बॅनरद्वारे दिली जाते. श्री. केळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुभेच्छांचे होर्डिंग्ज न लावता सामाजिक उपक्रम राबवत गेली अनेक वर्षे हे पथ्य पाळत असतात.

यंदाही ९ जुलै रोजी आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही कार्यकर्ते, पदाधिकारी शहरात होर्डिंग्ज, फलक लावून शुभेच्छा देत असतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज आणि बॅनर न लावता त्या पैशांतून शहरातील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी, लोकहिताचे उपक्रम राबवावेत, असे विनम्र आवाहन श्री.केळकर यांनी केले आहे.