Tuesday, December 23 2025 12:06 am
latest

वागळेतील रहिवासी घेणार मोकळा श्वास,

शिंदे सेनेच्या पदाधिका-यांनी घेतली आयुक्तांची भेट

ठाणे, 01 : वागळे इस्टेट सीपी तलाव येथील महापालिकेच्या कचरा हस्तांतरीत केंद्राच्या विरोधात स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता शिंदे सेना देखील यात उतरली आहे. गुरुवारी शिंदे सेनेच्या शिष्ट मंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यानंतर आता येत्या २० आॅगस्ट पासून येथील केंद्र कायमचे बंद होणार असल्याची हमी आयुक्तांनी दिली असल्याची माहिती शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी दिली. त्यामुळे आता वागळेतील रहिवासी आणि उद्योजक मोकळा श्वास घेणार आहेत. मागील काही दिवसापासून वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्राच्या मुद्यावरुन ठाण्यात रान पेटले आहे. मागील आठवड्यात स्थानिक नागरीकांनी हे केंद्र बंद करण्यासाठी आंदेलन केले होते शिवाय ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी देखील महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान गुरुवारी शिंदे सेनेच्या शिष्ट मंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना सीपी तलाव हस्तांतरण कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक राम रेपाळे, दिपक वेतकर, एकनाथ भोईर, एकता भोईर, मनिषा कांबळे, संध्या मोरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मागील कित्येक वर्षापासून येथील डम्पींग हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. महासभेत देखील वागळेतील डम्पींग हटविण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु तरी देखील पालिका प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आता मागील काही दिवसापासून येथे अधिक प्रमाणात कचरा डम्प होत असल्याने त्यातून निर्माण होणाºया दुर्गंधीमुळे येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच लघु उद्योगांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २० आॅगस्ट पासून येथील कचरा हस्तांतरण केंद्र बंद करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राम रेपाळे यांनी दिली. आता येथील कचरा भिवंडी येथील आतकोली येथे टाकला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली असल्याचे सांगितले.