Tuesday, June 30 2026 12:13 pm
latest

वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात येणार -वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, 30 : राज्यातील वणवे रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, यासाठी ऑस्ट्रेलियात वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात याचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य संजय खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

जगातील वनवे नियंत्रणाच्या प्रभावी पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियात पाठविले जाईल. तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजना, आधुनिक यंत्रसामग्री आणि अग्निशमन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.

कोकणातील वणव्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे श्री. मंत्री गणेश नाईक त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात बहुतांश वणवे खासगी जमिनीवरील झाडे, पालापाचोळा किंवा गवताला लागतात. वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्राबाहेर घटना घडल्यास विद्यमान नियमांनुसार वन विभागाकडून नुकसानभरपाई देता येत नाही. मात्र, संबंधित महिलेच्या कुटुंबाला अन्य शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल.

वणवे रोखण्यासाठी सॅटेलाइट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या माध्यमातून सतत देखरेख केली जात असून, आग लागल्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. वन संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकही त्यात सक्रिय सहभाग घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विदर्भात मोहाची फुले गोळा करण्यासाठी काही ठिकाणी आग लावण्याची प्रथा असल्याचे सांगत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाकडून मोहाची फुले आणि सुरुंगीची फळे गोळा करण्यासाठी विशेष जाळ्या (नेट्स) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आग लावण्याची गरज भासणार नाही आणि वनउत्पादनांची गुणवत्ताही सुधारेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.