ठाणे, 12 – रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने इयत्ता १० मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोमवारी घंटाळी येथे क्लबच्या वास्तू मध्ये करण्यात आला.
डिस्ट्रिक्ट 3142 मध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ हा एक अग्रगण्य क्लब कार्यरत आहे. या क्लबच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.रोटरी क्लब ठाणे नॉर्थच्या ठाण्यातील चार नामवंत शाळांमध्ये इंट्रॅक्ट क्लब आहेत. त्यात प्रामुख्याने ए के जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, सरस्वती सेकंडरी स्कूल, यशोधन विद्यामंदिर व सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल यांचा समावेश आहे. गेले वर्षभर या चारही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थने अनेक विविध उपयुक्त असे उपक्रम केले आहेत. त्यात प्रामुख्याने डिजिटल डिटॉक्स, गुड टच बॅड टच, गणपती आयडल मेकिंग, पर्यावरण पूरक कंदील बनविण्याची कार्यशाळा याचा उल्लेख करावा लागेल. सोमवार दिनांक 9 जून रोजी या चारही शाळांमधील दहावीत घवघवीत यश मिळवलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या एकूण 15 विद्यार्थ्यांचे ट्रॉफी, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सौ. मेघा जोशी, क्लब सेक्रेटरी अमोल नाले आणि युथ सर्विसच्या निशा कपिला उपस्थित होत्या. यावेळी या विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थितीत तर होतेच पण रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ चे सर्व सन्माननीय सदस्य आवर्जून उपस्थित होते अशी माहिती क्लब सेक्रेटरी अमोल नाले यांनी दिली आहे.
