मुंबई 16 राजस्थान राज्यातील बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंह आणि मनोजकुमार राठोड यांनी आज बाळासाहेब भवनात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजस्थान आणि महाराष्ट्र यांचे एकमेकांशी शौर्याचे एक नाते आहे. राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची भूमी आहे, तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांचेच विचार अंगिकारून आमच्या सरकारची वाटचाल सूरु असून या भूमीतून शिवसेनेमध्ये दोन नवे शिलेदार सामील झाल्यामुळे राजस्थानमधील शिवसेना अधिक बळकट झाली आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी मी स्वतः राजस्थानात एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलो होतो. तेथील लोकांमध्ये चांगले काम करायला मोठी संधी आहे, विशेषकरून वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यास त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. तसेच शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करावे असेही यासमयी सुचवले.
यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेनेचे राजस्थान राज्य प्रमुख लखनसिंह पंवार उपस्थित होते.
