Monday, March 9 2026 8:45 pm

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समता दिंडी

ठाणे, 27 -आरक्षणाचे जनक, रयतेचा जाणता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी १०.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जुने जिल्हा परिषद कार्यालय, मराठी ग्रंथसंग्रहालय, तलावपाली ठाणे येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नशा बंदीची घोषणा दिली तसेच नशा बंदी संदर्भातील फलक दाखवून माहिती देऊन जनजागृती केली. नशा मुक्तीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

या प्रसंगी अंमली पदार्थाच सेवन लहान मुलांमध्ये वाढत आहे, यासाठी जनजागृती करण गरजेचे आहे. सामाजिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. प्रौढ व्यक्तींनी देखील व्यसनापासून दूर राहावे तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा संदेश दिला आहे त्या तत्वांची अमंलबजाणी करणे ही काळाची गरज आहे. चांगला समाज घडवण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागुल, कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊराव मोहिते, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडीत व इतर अधिकारी तसेच बा‌.ना. बादोडकर महाविद्यालयातील व गौतम हिंदी विद्यालय येथिल विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

मराठी ग्रंथसंग्रहालय येथून प्रचार फेरी सुरू होऊन ठाणे रेल्वे स्टेशन रोड मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी पथ मार्गे जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून टेंभीनाका मार्गे कोर्टनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

व्यसन मुक्त भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. व्यसन कोणत्याही गोष्टीचे असल्याने आपल्याला हानी होतेच अति मोबाईलचा वापर देखील योग्य नाही असे प्रतिपादन समाज कल्याण विभाग प्रमुख मा. श्री. संजय बागुल यांनी केले.

तसेच कवी रघुनाथ बापू देशमुख यांनी कविता सादरीकरण करून जनजागृती केले. तंबाखू व इतर व्यसनापासून लांब राहून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी लक्ष्मण सुरोशे व दिलीप ओंकारेश्वर यांनी उत्तम नियोजन केले.