Monday, December 22 2025 10:53 am
latest

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

मुंबई, 18 : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, शेखर निकम, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भू-संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करुन काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावे. मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रगती पथावरील कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. प्रस्तावित प्रकल्पांचा परिपूर्ण अभ्यास करून नियोजन करावे. पाणी वितरण प्रणालींची तातडीने अंमलबजावणी करावी. प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ संस्था आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना मंत्री राठोड यांनी यावेळी दिल्या.

यावेळी रत्नागिरी व राजापूर मतदार संघांतील मृद व जलसंधारण प्रकल्प व भूसंपादनाची सद्यःस्थिती, कामांची सद्यःस्थिती व नवीन कामांसह तिवरे, (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) धरणाची उंची वाढविण्याविषयी आढावा घेण्यात आला.