“घर म्हणजे चार भिंती नव्हे, तर प्रेम-आनंदाचा संसार”
ठाण्यातील साईनाथ नगर येथील जय भवानी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांचे गृहस्वप्न पूर्ण
ठाणे, 29 : “घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर जिव्हाळा, प्रेम, आनंद आणि कुटुंबाच्या स्वप्नांचा किल्ला आहे. प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार व सुरक्षित घर मिळावे, हेच माझे ध्येय आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाण्यातील माजिवडा सर्कल येथील साईनाथ नगरमधील जय भवानी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना घरकुलांच्या चाव्यांचे वितरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ते उपमुख्यमंत्री असा माझा प्रवास ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच झाला. त्यामुळे घरांच्या चाव्या लाभार्थ्यांच्या हातात देताना मला नेहमीच विशेष आनंद होतो. प्रत्येकाचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील रखडलेले पुनर्विकास आणि गृहनिर्माण प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असून, प्रकल्पांमधील सर्व अडथळे दूर करून नागरिकांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी सांगितले की, राज्य सरकार क्लस्टर पुनर्विकासाला मोठी गती देत आहे. वागळे इस्टेटसह अनेक ठिकाणी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत, तर मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर येथे तब्बल १७ हजार घरांच्या क्लस्टर प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून मुंबई आणि ठाणे ही शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे आणि सन्मानाने जगता येईल असे घर मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असून, ३०० चौरस फुटांची दर्जेदार घरे नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहेत. या प्रकल्पात उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याबद्दल विकासक कटारिया यांचे त्यांनी कौतुक केले.
“देर आये दुरुस्त आये” असे म्हणत शिंदे यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. सर्वांनी एकत्रितपणे मदत केल्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकला, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी विकासकांना स्पष्ट संदेश देताना शिंदे म्हणाले, “नवीन गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागता कामा नयेत. आता तीन वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांनाच सरकारकडून पुढील कामे दिली जातील.”
या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, विविध मान्यवर, पदाधिकारी आणि घरकुलाच्या चाव्या स्वीकारणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
