Monday, December 22 2025 11:26 pm
latest

यवतमाळ जिल्ह्यात फसवणुकीतून उघडलेल्या बँक खात्यांची चौकशी करणार – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 16 : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात काही गावांमध्ये खोटे सांगून फसवणूक करीत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आली. रोजगार हमी योजनेची कामे मिळवून देतो, या योजनेची अधिकची मजुरी बँक खात्यात मिळवून देतो, असे सांगून ही बँक खाती उघडण्यात आली. या बँक खात्यात आलेली रक्कम इतर बँक खात्यात वळती करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

फसवणूक करीत उघडलेल्या बँक खात्यातील रक्कम परस्पर वळती केल्याबाबत सदस्य राजू तोडसाम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

याबाबत अधिक माहिती देताना गृहराज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, ही घटना यवतमाळ जिल्ह्यात ११ जुलै रोजी घडली. खोटे सांगून १५ लोकांचे बँक खाते उघडण्यात आले. या खात्यात रक्कम पाठवण्यात आली आणि संबंधितांना न सांगता ते पैसे इतर खात्यात वळविण्यात आले. यामधून जवळपास ७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक तपास करण्याच्या सूचना सायबर सेलला देण्यात आल्या आहेत. ही खाती तातडीने गोठवून यामधील रक्कम परत देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आरोपी फरार असून त्यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, असेही गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.