मुंबई, 16 : मौजे जांभे (ता. जि. सातारा) येथील गट नं. 30 व इतर गटांच्या जमिनी प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, सद्यस्थितीत अपर जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून सुनावणी सुरू आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना सांगितले.
सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी सदस्य प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभाग घेतला.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, या जमिनीचे कब्जेदार म्हणून संबंधित जमीनधारकांना घोषित करण्यात आले आहे. सन 1955 पासून सिताबाई महाडीक यांचे नाव 7/12 उताऱ्यावर दिसून येते. तसेच ‘गावकरी सर्व लोक वहिवाटदार’ असा शेरा नमूद आहे. सन 2004 नंतर गावकरी सर्व लोक वहिवाटदार यांचे नाव उताऱ्यावरून हटवण्यात आले, मात्र त्यासंदर्भातील आधार स्पष्ट नाही. यासंबंधीचा अर्धन्यायिक सुनावणीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. सदर प्रकरणात सन 2010 मध्ये जमिनीचे कब्जेदार अभयसिंह पाटणकर यांनी आठ व्यक्तींना नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे विकली असून 7/12 वर त्यांची नोंद झाली आहे.
