Monday, June 22 2026 11:38 pm

मोदी-शाह हे देशाच्या राजनैतिक शक्तीपीठाचे आधारस्तंभ सहकारातून समृद्धीचा नवा अध्याय : एकनाथ शिंदे

इचलकरंजीत जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि कल्लाप्पाण्णा आवाडे साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळा

इचलकरंजी, 22 : कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असले तरी देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे शक्तीपीठ म्हणजे पोलादी पुरुष अमित शाह आहेत. मोदी यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेले, तर अमित शाह यांनी देशाची सुरक्षा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

केंद्रीय गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या “कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना” या नामविस्तार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मुश्रीफ, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, रवींद्र चव्हाण, माधुरीताई मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लाडक्या बहिणी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ सहकार नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, वयाच्या 95 व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. हा केवळ साखर कारखान्याचा कार्यक्रम नसून सहकारातून समृद्धीकडे नेणाऱ्या चळवळीचा उत्सव आहे.

शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली बारा वर्षे अखंडपणे देशसेवा करत आहेत. त्यांनी भारताला विकास आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेले असून जगभरात भारताची ताकद वाढवली आहे. देशाच्या राजनैतिक शक्तीपीठातील दुसरे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह. पोलादी पुरुष, विकास पुरुष, नक्षलवादाचा कर्दनकाळ आणि राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख आहे. देशातील अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याबरोबरच सहकार क्षेत्राला नवे बळ देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.

नक्षलवाद संपविण्याचा त्यांनी निर्धार केला असून “देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी अमित शाह अहोरात्र काम करत आहेत. सामान्य माणसाला स्वप्न पाहण्यासाठी रात्र कमी पडते, मात्र अमित शाह यांना विकासाची नवी स्वप्ने साकार करण्यासाठी दिवस आणि रात्र दोन्हीही कमी पडतात. देश, समाज आणि सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात,” असे शिंदे म्हणाले.

अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास व सुशोभीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सांस्कृतिक वारसा आणि विकास यांचा समतोल साधण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्र काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित झाले होते. सहकार म्हणजे स्वतःचा उद्धार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे दिल्यानंतर या क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रातून सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे.

सहकार क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचावा यासाठी अमित शाह यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी गृहकर्ज मर्यादा वाढविणे, वन टाइम सेटलमेंट सुविधा, स्वतंत्र अंब्रेला ऑर्गनायझेशन, स्वतंत्र को-ऑपरेटिव्ह क्लिअरिंग हाऊस उभारणी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे सहकारी बँकांची आर्थिक क्षमता आणि विश्वासार्हता अधिक मजबूत झाली आहे.

सहकार क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सहकारी संस्था अधिक सक्षम व्हाव्यात, व्यवसाय वाढावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी सहकार क्षेत्रावर काँग्रेसची मक्तेदारी होती. मात्र अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ती मोडून काढण्यात आली आहे. आता सहकार चळवळ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागातील लोकांना त्याचा थेट फायदा होत आहे.

पश्चिम महाराष्ट्र ही देशातील साखर सहकार चळवळीची भूमी आहे. देशातील साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा म्हणजे सहकारी साखर कारखाने आहेत. भारत विकसित राष्ट्र व्हायचा असेल तर सहकार चळवळ अधिक मजबूत झाली पाहिजे, ही अमित शाह यांची भूमिका असून शेतकरी, साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे शिंदे म्हणाले.

इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, “माणसांच्या मनाला विणणारी बँक” ही टॅगलाईन बँकेच्या कार्यपद्धतीचे उत्कृष्ट वर्णन करते. गोवा, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्येही बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. सर्वोत्कृष्ट बँकेचा बहुमान मिळविणाऱ्या या संस्थेची नव्याने उभारलेली प्रशासकीय इमारत आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख सहकार व्यवस्थेचे नवे केंद्र बनेल.

जवाहर सहकारी साखर कारखान्याचे नामकरण “कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना” असे करण्यात आल्याचा आनंद व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, सहकार क्षेत्रासाठी आयुष्यभर झटलेल्या नेतृत्वाला दिलेली ही योग्य भेट आहे.

विकास, समृद्धी आणि शेतकरी सक्षमीकरणाचा नवा अध्याय आजपासून सुरू होत आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उत्तम आरोग्य लाभावे, त्यांनी शंभरी पूर्ण करावी आणि त्यांचे मार्गदर्शन पुढील पिढ्यांना मिळत राहावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

महायुती सरकार शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, त्यांच्या जीवनात समृद्धी यावी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी हिंदीतील काव्यपंक्ती सादर करत अमित शाह यांच्या सहकार धोरणांचे कौतुक केले. “गांव के आंगन में खुशहाली की बहार आई है, आपकी सहकार नीतियों ने कमाल की क्रांति लाई है. जो सहकार कभी कागज पर सिमटकर रह गया था, अब सहकार की समृद्धि हर चौखट तक पहुंची है,” अशा शब्दांत त्यांनी सहकार क्षेत्रातील परिवर्तनाचा गौरव गौरव करत आपल्या भाषणाची सांगता केली.