Thursday, February 5 2026 7:24 am

मुंब्रा परिसरात ठामपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला मतदानाचा संदेश

ठाणे, 06 – येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंब्रा प्रभाग समिती स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने रॅली, प्रभात फेरी, पथनाट्य व मतदान शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

मतदानाचा टक्का वाढावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे.

मुंब्र्यातील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 31, 73, 74,96, 99,100,106,108,119,125 या शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या मुंब्र्यातील विविध भागात प्रभात फेरी काढली. यावेळी मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार असून तो प्रत्येकांने बजावावा असा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला. ‘आपल्या शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडा..’ ‘आपलं मतदान आपला आवाज..’, ‘लोकशाहीचा आधार.. करु सर्वाधिक मतदान’ असे फलक हातात घेवून विद्यार्थ्यांनी मुंब्र्यात मतदानाबाबत जनजागृती केली.