मीरा भाईंदरमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आक्रमक हल्लाबोल
“ही सभा प्रचाराची नाही, विजयाची नांदी आहे”
शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी १५ जानेवारीला मतदानाचे आवाहन
मीरा भाईंदर, 12 : “मीरा भाईंदरवर बाळासाहेबांचे प्रेम होते. मुंबई भगवी आहे, ठाणे भगवे आहे आणि आता मीरा भाईंदरही भगवे होणारच,” असा ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर सभेत केला. “ही सभा प्रचाराची नाही, ही विजयाची नांदी आहे,” असे सांगत १५ जानेवारी रोजी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सभेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचंड जनसमुदाय, भगव्या झेंड्यांची गर्दी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
“लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे मनापासून स्वागत करतो. एवढी गर्दी पाहून विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असे आक्रमक शब्द वापरत शिंदे यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल केला.
ठाण्यात रोड शो करून थेट मीरा भाईंदरमध्ये दाखल झालेल्या शिंदे यांनी या शहराशी असलेली आपुलकी व्यक्त केली. “मीरा भाईंदर हे ठाण्याइतकंच प्रेमाचं शहर आहे. बाळासाहेब ठाकरे यांचंही या शहरावर प्रेम होतं,” असे त्यांनी सांगितले.
या सभेत बोलताना शिंदे यांनी कार्यसम्राट मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले.
“प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरवर भगवा डौलाने फडकवण्याचा विडा उचलला आहे. प्रताप नावातच विजय आहे, ते विजय प्रतापच करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“या निवडणुकीत शिवसेनेचे ८१ उमेदवार रिंगणात आहेत. ८१ म्हणजे आपला लकी नंबर ९. या व्यासपीठावरूनच सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करून विरोधकांचा डब्बा गुल करायचा आहे,” असे शिंदे म्हणाले.
महायुती, आघाड्या आणि विरोधकांच्या टीकांवर बोलताना शिंदे म्हणाले, “आमचा अजेंडा एकच आहे. मीरा भाईंदरचा विकास आणि जनतेचा विकास. इम्पॉसिबल हा शब्द शिवसेनेच्या डिक्शनरीत नाही. इम्पॉसिबलला पॉसिबल करणं हीच शिवसेनेची ओळख आहे.”
गेल्या तीन वर्षांत १८७१ कोटींचा निधी दिला.
ड्रेनेज व पाणीपुरवठ्यासाठी ७७० कोटी,
महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती,
दिवाणी न्यायालयाची भव्य इमारत, दहिसर–काशिमीरा मेट्रो लाईन ७, भाईंदर उड्डाणपूल प्रकल्प,
टोलनाका हटवून नागरिकांना दिलासा, अशा विकास कामांचा पाढा त्यांनी वाचला.
“आज रस्ते काँक्रीटचे दिसतायत, विकास डोळ्यांसमोर आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही, काम करून दाखवतो,” असे ठणकावून सांगत शिंदे यांनी या सर्व विकासकामांचे श्रेय शिवसेनेलाच दिले.
मीरा भाईंदर हे मिनी इंडिया असल्याचे सांगत उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी, बंगाली, साऊथ इंडियन समाजांसाठी उभारलेल्या समाजभवनांचा उल्लेख शिंदे यांनी केला. “सर्व समाजांना सोबत घेऊन जाणं हीच शिवसेनेची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.
“१५ तारखेला ‘जय श्रीराम’ म्हणत प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबा आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आक्रमक आणि भावनिक आवाहन करत एकनाथ शिंदे यांनी भाषणाचा समारोप केला. या सभेमुळे मीरा भाईंदरमध्ये निवडणूक वातावरण तापले असून शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचा स्पष्ट संदेश या सभेतून मिळाला आहे..
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाप्रमुख राजू भोईर, माजी नगरसेवक विक्रम प्रताप सिंह आणि शिवसेनेचे मीरा भाईंदर मधील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
