मुंबईची तिजोरी लुटणारे करप्शनसम्राट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा मुंबईतून शुभारंभ
मुंबई, 05 – मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झालाय. मुंबईतील कचरा,रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन दाखवणारे कार्यसम्राट नव्हे तर करप्शनसम्राट बनले, असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि मराठी माणूसच महापौर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. वरळी येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात मुंबई महापालिकेतील उबाठाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार कोणामुळे झाला, मेट्रो प्रकल्पात खो कोणी घातला, बेस्टचं वाटोळं कोणी केलं, कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली, बॉडीबॅगमधून पैसे बनवण्याचे पाप कोणी केलं, गरीब मुंबईकरांच्या घराच स्वप्न धुळीस कोणी मिळवल, मुंबईतील मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कोणी घातले, बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कोणी पुसली, पत्राचाळीच्या लोकांना देशोधडीला कोणी लावलं असे सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. त्यांची भूमिका करप्शन फर्स्ट तर महायुतीचे मुंबई फर्स्ट आहे. महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचे मिशन आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्यासाठी म मराठीचा नव्हे तर मलिदा, मतलाबाचा आणि मुजोरीचा आहे. तर महायुतीसाठी म मराठीचा, महाराष्ट्राचा आणि महायुतीचा आहे. मराठी माणसाला खुराड्यात ठेवणारे वर्षाला नव्या माड्या बांधत राहिले. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरची चलती होती. मात्र साडेतीन वर्षात महायुतीने मुंबईचा कायापालट केला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सत्तेसाठी लाचार होऊन बाळासाहेबांचे विचार सोडले, भाजपच्या पाठित खंजीर खुपसणारे खरे सूर्याजी पिसाळ आहेत, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही तर सत्तेतून पायउतार झालो. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली आणि शिवसेनेचे खच्चीकरण होत होते म्हणून आम्ही धाडस केलं, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, इतके वर्ष सत्तेत या लबाड लोकांनी फक्त घबाड कमावण्याचे काम केले तेव्हा व्हिजन कुठे गेलं होते. जनतेने त्यांचा सिझन संपवला म्हणून त्यांना व्हिजन आठवलं, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तुम्ही मुंबईची तिजोरी लुटण्याचे काम केले. तुम्हाल तुमचे भविष्य सेफ करायचे आहे पण आम्हाला मुंबईकरांचे भविष्य सेफ करायचे आहे, असे ते म्हणाले. महायुतीचे काम म्हणजे नो रिजन ऑन धीस स्पॉट डिसीजन आहे. आजची सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातली ललकारी आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी आणि मराठी माणसांसाठी अनेक निर्णय घेतले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यांना मराठी भाषेचा नाही तर महापालिकेच्या तिजोरीचा पुळका आहे. मुंबई म्हणजे सोन्याची अंड देणारी कोबडी समजले. आतापर्यंत अंडी खाऊन झाले आणि कोबंडी कापायला निघाले. मुंबई आणि मराठी माणूस संकटात आहेत, अशी आवई उठवून २०१२ आणि २०१७ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या पण त्यांच्या संधीसाधू राजकारणाला मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसांची होती आणि सदैव मराठी माणसांचीच राहील. कोणाच्याही सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत तर विकासाचे वारकरी हवे आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले. आजची प्रचार सभा म्हणजे विजयाची नांदी आहे. लोकसभा जिंकलो, विधानसभेला ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि नगर पालिकांमध्ये ७५ टक्क्यांहून जास्त जागा मिळवून विजयाची हॅट्ट्रीक केली. आता महापालिकांमध्ये विजयाचा चौकार मारायचा आहे. २०२५ हा फक्त ट्रेलर होता आता पूर्ण पिक्चर बाकी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही दोघेही भाऊ इथं आहोत. कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
चौकट
जनतेने बॅंड वाजल्यावर ब्रॅंडची आठवण झाली
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसे युतीवर सडेतोड टीका केली. ते म्हणाले की मराठी माणसासाठी एकत्र आलेले दवंडी पिटवतात मग २० वर्षांपूर्वी कोणासाठी आणि कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका.त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता अहंकार होता पण आता जनतेने बॅंन्ड वाजवल्यावर तुम्हाला ब्रॅंडची आठवण आहे. पण खरा ब्रॅंड फक्त बाळासाहेब आहेत आणि महायुतीचा सामान्य कार्यकर्ता हा आपला ब्रॅंड आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
[11:19 pm, 3/1/2026] +91 97696 52567: दि.३जानेवारी२०२६
शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचारशुभारंभ;महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक – उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास
लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे दि.३: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मंगलमय सुरुवात करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साळी आणि रमेश कोंडे यांसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
‘ही लढाई शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची’
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “समोर धनाढ्य आहेत, आपल्याकडे संघर्ष करणारे शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांनी नेहमी धनशक्तीला भुईसपाट केले आहे. राज्यात प्रथमच शिवसेना १२० हून अधिक जागांवर लढत आहे. उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता, निकालानंतर पुण्याचा महापौर बनवताना शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या समस्या सोडवल्या असून, पुणेकर शिवसेनेला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटच्या दिवसांत दबाव-दादागिरी होऊ शकते, मात्र शिवसैनिक घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे: लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महायुती होऊ शकली नाही, यासाठी मोठ्या भावाची अधिक जबाबदारी होती. शिवसेनेच्या मागण्या सन्मानजनक होत्या.” लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा अपप्रचार जनतेने फेटाळला आहे. निवडणुकीत जनता पुन्हा शिवसेनेला साथ देईल. प्रचारात सकारात्मक राहावे, विरोधकांवर टीका टाळावी. शिंदे यांची पूर्ण ताकद उमेदवारांपाठीशी आहे.
शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात एकूण ११९ उमेदवार असून त्यामध्ये अनुसूचित जातीच्या दहा महिला आणि आठ पुरुष आहेत तर अनुसूचित जमातीचे एक, मुस्लिम समाजाचे पाच यामध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि ५५ पुरुष व ६५ महिला उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. जे की इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक महिलांना उमेदवारी देणारा शिवसेना पक्ष ठरला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
सत्तेत आल्यास पीएमपीमध्ये महिलांना अर्धे तिकीट, प्रत्येक प्रभागात ‘आपला दवाखाना’, नवीन धरणे, अपघात-कोंडीमुक्त पुणे, मंदिरांचे संरक्षण करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी संघटनात्मक ताकद आणि लढाऊ परंपरेवर विजयाचा विश्वास व्यक्त केला.
