Monday, December 22 2025 4:58 am
latest

मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास मान्यता, २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करणार

मुंबई, 04 -मुंबईतील आणिक डेपो – वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास व त्यासाठी आवश्यक २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मुंबई मेट्रो मार्गिका-११ ही मुंबई मेट्रो मार्गिका-४ (वडाळा-ठाणे-कासारवाडवली) चा विस्तार भाग आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून तयार करुन घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्यावतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गिकेचा ७० टक्के भाग हा भुयारी आहे. यात १३ भूमिगत आणि एक भू-समतल स्थानक उभारण्यात येणार आहेत. या १७.५१ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पास पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीने यापुर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे ३ हजार १३७ कोटी ७२ लाख रुपयांचे समभाग (equity) आणि ९१६ कोटी ७४ लाक रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मिळविण्याकरिता विनंती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी स्वीकारण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.