Thursday, February 5 2026 10:16 am

‘माझे मत – माझे भविष्य’ अभियान स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, 30 : ‘माझे मत- माझे भविष्य’ .. “आम्ही राबवू स्वच्छता अभियान, पण तुम्ही करा हक्काने मतदान” अशा घोषणा देत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उथळसर प्रभाग समिती अंतर्गत मतदार जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविले. महापालिका आयुक्त निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखली, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्याने स्वीप उपक्रमांतंर्गत शहरातील विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या पुढाकाराने स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने उथळसर प्रभाग समितीअंतर्गत (प्रभाग क्र. 10,11 व 12) मतदार जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. आंबे घोसाळे तलाव व केसर मिल सर्कल परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ‘माझे मत – माझे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानात स्वच्छता कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे स्थान तसेच प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान का करावे, मतदानाद्वारे सक्षम लोकशाही कशी बळकट होते, याची माहिती देत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीपर सामूहिक घोषणा देण्यात आल्या तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मतदानाची सामूहिक शपथ घेण्यात आली.

मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून तो एक महत्त्वाचा अधिकार आणि जबाबदारी आहे, याची जाणीव उपस्थित कर्मचाऱ्यांना करून देण्यात आली. सर्वांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तसेच परिसरातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे व आगामी निवडणुकीत न चुकता मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी “आम्ही राबवू स्वच्छता अभियान, पण तुम्ही करा हक्काने मतदान”अशी घोषणा देत मतदारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. अभियानामुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून लोकशाही सहभाग वाढविण्यास हातभार लागला आहे.