Wednesday, February 4 2026 7:40 am

माघी गणपती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक व्यवस्था

ठाणे 21 : माघी गणेशोत्सव 22 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. 10 दिवस हा गणेशोत्सव असून, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तरी गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकार व विक्रेत्यांना मूर्ती विक्री करताना त्याबाबत विक्री रजिस्टर ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळाकडून बसविण्यात येणाऱ्या मुर्तीबाबतची आवश्यक सर्व माहिती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे किंवा नाही, मूर्तीची उंची किती आहे आदी संकलित करुन त्यानुसार विसर्जनाचा आराखडा व व्यवस्था निर्माण करण्यात आला आहे.

तसेच सार्वजनिक मंडळांना विसर्जनासाठी प्रतिकात्मक स्वरूपात लहान मूर्ती ठेवण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृत्रिम तलाव, टाकी विसर्जन व्यवस्था व खाडी घाट येथे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. 2 ते 3 फूट उंचीच्या मूर्ती टाकीमध्ये, 3 ते6 फूट मूर्ती कृत्रिम तलावात तर 6 फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडीमध्ये करण्याच्या सूचना सर्व प्रभागसमिती स्तरावरुन सर्व सार्वजनिक मंडळांना देण्यात आल्या आहेत. विसर्जनातून निर्माण होणारे पाणी महापालिकेमार्फत शुद्धीकरण करूनच जलस्रोतांत सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तसेच मूर्ती विसर्जन करण्यात येणारे पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे शुध्दीकरणानंतर जलस्त्रोतात सोडले जाणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.

माघी गणपती विसर्जनसाठी करण्यात आलेली व्यवस्था

कोपरी–नौपाडा – कृत्रिम तलाव: मासुंदा तलाव घाट, खाडी घाट: कोपरी विसर्जन खाडी घाट

कळवा – टाकी व्यवस्था : निसर्ग उद्यान परिसर –1 टाकी, कृत्रिम तलाव : पारसिक रेती बंदर, खारेगाव तलाव घाट, रेल्वेट्रॅक विटावा परिसर, न्यू. शिवाजी नगर,कळवा, खाडी घाट: पारसिक रेती बंदर, कळवा विसर्जन घाट

दिवा- कृत्रिम तलाव: दातिवली तलाव, खाडी घाट: खर्डीगाव खाडी घाट

मुंब्रा – टाकी व्यवस्था: रेती बंदर घाट – 2 टाकी, राणानगर –1 टाकी खाडी घाट: रेती बंदर घाट–1, रेती बंदर घाट–2 (राणानगर), बाबाजी पाटील वाडी घाट

माजिवडा–मानपाडा – कृत्रिम तलाव : रेवाळे कृत्रिम तलाव, खाडी घाट: कोलशेत विसर्जन घाट, बाळकुम विसर्जन घाट, गायमुख विसर्जन घाट

वागळे – टाकी व्यवस्था: रस्ता क्र. 22, नेपच्यून एलिमेंट कंपनीजवळ – 1 टाकी, रायलादेवी कृत्रिम तलाव – 1 टाकी

वर्तकनगर – टाकी व्यवस्था : पायलादेवी मंदिर उपवन तलाव – 1 टाकी