मुंबई, 16: पिंपरी चिंचवड शहरात कागदपत्रांचा गैरवापर करून स्थापन केलेल्या बोगस कंपन्यांमार्फत सामान्य माणसाची फसवणूक करण्याबरोबरच जीएसटी चुकवणाऱ्या अशा कंपन्यांची राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर (स्टेट जीएसटी) विभाग आणि आणि गृह विभाग यांच्यामार्फत संयुक्तपणे तपासणी करून दोषींवर कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना आज विधानसभेत मांडली.
राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले, बनावट कंपनी स्थापन करून जीएसटी बुडवणे याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच कागदपत्रांचा गैरवापर करून स्थापन केलेल्या मे. डी. बी. इंटरप्राईजेस या कंपनीचा नोंदणी दाखला रद्द करण्यात आला आहे. या गैरव्यवहाराबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, आणि यानंतर या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही राज्यमंत्री जयस्वाल यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
