16 : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे उपलब्ध व्हावीत, यासाठी बियाणे परीक्षण व वितरण प्रक्रियेत आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार विधीमंडळ सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांना पुरवण्यात येत असलेल्या बोगस बियाणे संदर्भात आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सई डहाके यांनीही सहभाग घेतला
कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले, शेतकऱ्यांना बोगस व उगवण क्षमता नसणारी बियाणे पुरवणे ही गंभीर बाब असून याची शासनाने दखल घेतली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे उगवण क्षमतेचे बियाणे मिळावे या संदर्भात सुधारणा आणि निश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार विधीमंडळ सदस्यांची विशेष समिती काम करेल.
राजमंत्री जयस्वाल यांनी सांगितले, वर्धा जिल्ह्यात बोगस व उगवणक्षम नसलेल्या बियाण्यांच्या सॅम्पल तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, सहा सॅम्पलपैकी पाच सॅम्पल उगमक्षम नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रातून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असे ते म्हणाले.
बोगस व उगवणक्षम नसलेल्या बियाण्यांचा पुरवठा संदर्भात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल व जे अधिकारी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही कृषी राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
०००
