Wednesday, February 4 2026 6:15 am

बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, 29 : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यात येत असून आगामी काळात बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक साधने, डिजिटल शिक्षण सामग्री तसेच जीवनोपयोगी विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) भूमिका महत्त्वाची असून बालभारतीला अधिक सक्षम बनविण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, माध्यमिक शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे, प्राथमिक शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, सुकाणू समितीचे श्रीपाद देखणे, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले की, बालभारतीने अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मितीत नाविन्यपूर्ण बदल स्वीकारताना शिक्षक, पालक आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करावा. कृषी, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म यासारखे विषय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार असून अभ्यासक्रम समाजाच्या गरजांशी सुसंगत असावा. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शालेय शिक्षण विभाग कार्यरत असून गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.
सन १९६८ पासून गेली ५९ वर्षे बालभारती दर्जेदार, संस्कारक्षम व वैशिष्ट्यपूर्ण पाठ्यपुस्तके अल्प दरात उपलब्ध करून देत आहे. या कार्यात शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, लेखक, विषयतज्ज्ञ, शिक्षक व अधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. छापील पाठ्यपुस्तकांबरोबरच ई-बुक्स, डिजिटल पाठ्यपुस्तके, क्यूआर कोड, ई-कंटेंट, ऑडिओ-व्हिडिओ साहित्य यामुळे बालभारतीने काळानुरूप बदल स्वीकारले आहेत.

सध्या बालभारतीत मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू, कन्नड आदी दहा भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येते. तसेच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण अशा भाषेतर विषयांसह एकूण १६ विषयांचे अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत राज्यभरात शासकीय ध्वजवंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांचे एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन आयोजित करण्यात आले. यामध्ये राज्यातील सुमारे एक लाख शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी तसेच सात लाख शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन या संस्थेने घेतली असून यामधून एक विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे.

‘शिक्षण आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण असावे’ या उद्देशाने इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके २०२५ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. तसेच २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वयंसंरक्षण प्रशिक्षण, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रबोधन वर्ग तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन जीवनाशी निगडित बाबी लक्षात घेऊन पुस्तकनिर्मिती केली जात असल्याचे सांगितले. बालभारतीच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगताना संचालक अनुराधा ओक यांनी कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार २७ जानेवारी १९६७ रोजी पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना झाल्याची माहिती दिली. सध्या संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे दीड हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून जबाबदारीने व दर्जेदारपणे काम करण्याचा संकल्प करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ‘किशोर’ मासिकाचे प्रकाशन तसेच ‘बालभारती गीता’चे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दिलेले शुभेच्छा संदेश चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभेच्छा संदेश वाचन करून दाखविण्यात आला.