Monday, December 22 2025 5:04 am
latest

बांधकामे आणि विकासकांचा निष्काळजीपणा यामुळे डासनिर्मिती.. नियम मोडणारी बांधकामे बंद करा – आमदार संजय केळकर..

ठाणे, 20 -ठाण्यात अनेक ठिकाणी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे सुरू असून आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली विकासकांकडून होत असते. परिणामी शहरात डासांचे प्रमाण वाढत असून मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डासनिर्मिती करणारी ही बांधकामे त्वरित बंद करण्यात यावीत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी प्रशासक तथा आयुक्त डॉ.सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अधिकृत, अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. विकासक आणि कंत्राटदार रॅबिट, बांधकाम साहित्य, कचरा, पाण्याच्या कुंड्या आदी गोष्टी अस्ताव्यस्त ठेवत असतात. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून असतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, मोठ्या प्रमाणात डासनिर्मिती होते. आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शाळा सुरू झाल्यामुळे अशा परिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यूची लागण झाल्याचे प्रकार वाढत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी पत्राद्वारे श्री.राव यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या प्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष देऊन प्रभागनिहाय प्रत्यक्ष पाहणी करावी, जे बांधकाम व्यावसायिक नियमांचा भंग करतात, त्यांची बांधकामे त्वरित थांबवावीत तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना देखील कडक समज देण्यात यावी, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली आहे.

जानेवारी ते १८ जून २०२५ या काळात ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात २९९ मलेरियाच्या रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद आहे तर याच काळात १६४ डेंग्यूच्या रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण खूप मोठे आहे. एका शाळेत ४५ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यावरून मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांची आणि डास निर्मितीची भयावह स्थिती स्पष्ट होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.