Monday, December 22 2025 5:52 am
latest

प्रो गोविंदा लीग सीझन ३ ची ठाण्यात दमदार सुरुवात; १६ संघ अंतिम फेरीसाठी पात्र

ठाणे, २९ महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिक क्रीडाविश्वाशी जोडणाऱ्या प्रो गोविंदा लीग सीझन ३ ची शानदार सुरुवात ठाणे येथे झाली. यंदाच्या पात्रता फेरीनंतर १६ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून, ७ ते ९ ऑगस्टदरम्यान मुंबईतील डोम एसव्हीपी, वरळी येथे ही महाअंतिम स्पर्धा रंगणार आहे.

या लीगमध्ये राज्यभरातून आलेल्या ३२ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. त्यांनी शिस्त, ताकद आणि टीमवर्कचे उत्तम प्रदर्शन करत आपले कौशल्य सादर केले. यंदाचा हंगाम अधिक भव्य होत असून, ही लीग राष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे.

पात्रता फेरीदरम्यान, महाराष्ट्र राज्याचे वाहतूक मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांनी उपस्थित राहून सहभागी पथकांचे उत्साहवर्धन केले. लीगचे अध्यक्ष श्री. पूर्वेश सरनाईक यांनी यंदाच्या हंगामाबाबत बोलताना सांगितले, “ही लीग केवळ पारंपरिक उत्सव नसून, तरुणांसाठी एक व्यावसायिक क्रीडा व्यासपीठ आहे. ताकद, शिस्त आणि संघभावना यांचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेची व्याप्ती आता राज्याच्या पलीकडे पोहोचला आहे.”

आगामी ५ जुलै रोजी मुंबईत संघ लिलावाचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी अधिकृतपणे संघांचे अनावरण होणार आहे. मालक आणि गोविंदा संघांची अधिकृत खरेदी प्रक्रिया यावेळी पार पडेल.

प्रो गोविंदा लीग सीझन ३ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आधुनिक अविष्कार म्हणून ओळखले जात असून एकता, धैर्य आणि खेळभावनेचा उत्कट संगम साजरा करत देशपातळीवरील क्रीडारसिकांचे मन जिंकण्यास सज्ज झाले आहे.