Monday, December 22 2025 9:27 pm
latest

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचा अनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, 16 : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेच्या अनुदान संदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवावा, असे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तरच्या तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य सत्यजित देशमुख यांनी प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवास शाळेच्या अनुदान संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सावे यांनी सांगितले, कासेगाव ( ता. वाळवा जि. सांगली) येथील दानिश सामाजिक व शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत २००८ पासून वाटेगाव येथे ही निवासी शाळा सूरू आहे. या शाळेस ३ जून २००९ अन्वये २५ निवासी विद्यार्थी संख्येवर कायमस्वरूपी विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. या शाळेच्या नोंदणीपत्राचे नूतनीकरण ३१ मार्च २०२८ पर्यंत वैद्य आहे. संस्थेने १८ ऑगस्ट २००४ शासन निर्णयाच्या आकृतीबंधानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती केली आहे.

शासन निर्णय १६ जुलै २००४ मधील मार्गदर्शक सूचनानुसार निवासी शाळा व उपक्रमास १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अनुदान निर्धारणासाठी विचार करता येईल अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार सदर संस्थेने प्रस्ताव सादर केला होता. तथापि, या प्रस्तावात त्रुटी असल्याने हा प्रस्ताव त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. ऑक्टोबर अखेर प्रस्ताव प्राप्त झाल्यास जानेवारीमध्ये अनुदान देण्यासंदर्भात कार्यवाही होत असल्याने हा प्रस्ताव ऑक्टोबर पूर्वी प्रस्ताव सादर करावा, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.