Monday, December 22 2025 6:54 am
latest

प्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश – पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील

बुलडाणा, 29 : जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिके, फळबागा आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडल्यामुळे जीवितहानी, पशुधन हानी तसेच रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून पंचनामे तातडीने पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मान्सून कालावधीत प्रशासनाने कार्यालयीन चौकटीपलीकडे जाऊन थेट फिल्डवर जाऊन काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोर धरलेला असून काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे व पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहनही पालकमंत्री जाधव-पाटील यांनी यावेळी केले.