Monday, December 22 2025 7:48 am
latest

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

सोलापूर, 11 :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळ परिसरात जवळपास दीड हजार नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या शामियानाची तसेच धावपट्टी व विमानतळाची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करून संबंधित यंत्रणाना कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, विमानतळ प्राधिकरण चे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा, सहाय्यक व्यवस्थापक अंजनी कुमारी, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सायंकाळी विमानतळ पार्किंग एरियात उभारण्यात आलेल्या पेंडॉलची पाहणी केली तसेच व्यासपीठ व अन्य सोयीसुधाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विमानतळ परिसर धावपट्टी या ठिकाणी सकाळी आठ तीस ते दहा या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच प्रशासन व विमानतळ प्राधिकरण तसेच फ्लाय 91 यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.