मुंबई, 16 : पवित्र पोर्टल रद्द केले जाणार नाही, मात्र त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. तसेच राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया सुरूच राहील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ भोयर बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री ॲड. निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, किशोर दराडे, भावना गवळी, प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, 2017 पासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदांनुसार उमेदवारांची नियुक्ती केली जाते. मात्र, अनेक वेळा उमेदवार उपस्थित राहत नाहीत किंवा पात्र ठरत नाहीत, अशी समस्या निर्माण झाली आहे. उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. पोर्टल बंद ठेवणे उचित नसून प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे. आधीच नियुक्त उमेदवारांची नावे पोर्टलवरून हटवण्याचे निर्देश विभागाला देण्यात येणार आहेत. संस्थाचालकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ भरती प्रक्रिया सुनिश्चित केली जाईल.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक मिळावेत यासाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवली जाईल. सर्व योग्य सूचना शासन निश्चितपणे लक्षात घेईल आणि पोर्टल अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी पुढाकार घेईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी दिली.
