Monday, December 22 2025 2:09 pm
latest

पर्यावरणस्नेही असलेल्या अक्षय उर्जेचा वापर आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज : शरद पुस्तके

विचारमंथन व्याख्यानमालेचे 16 वे पुष्प

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

ठाणे, 23 : नैसर्गिक स्त्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परावर्तित न होणारी उर्जा म्हणजे अक्षय उर्जा. ही उर्जा पर्यावरणपूरक असून ती प्रदुषण निर्माण करीत नाही, सतत मिळणारी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही अशी अक्षय उर्जा असून तिचा वापर हा आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज असल्याचे फाऊंडेशन फॉर इंटरडिसिल्पिनरी रिसर्चचे संस्थापक विश्वस्त शरद पुस्तके यांनी नमूद केले.

22 एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ठाणे महापालिकेने विचारमंथन व्याख्यानमालेअंतर्गत ‘अक्षय उर्जा व संवर्धन’ या विषयावरील व्याख्यान कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे 16 वे पुष्प शरद पुस्तके यांनी गुंफले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठाणे शहरातील नागरिक उपस्थित होते.

अक्षय म्हणजे न संपणारी आणि उर्जा म्हणे शक्ति आणि वेळ. कमीत कमी उर्जा संसाधने वापरुन जास्तीत जास्त उत्पादन किंवा परिणाम मिळविणे. आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच भविष्यातील उर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असल्याचे शरद पुस्तके यांनी नमूद केले. उर्जेचे स्त्रोत नमूद करताना सौर उर्जा म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळणारी उर्जा, पवन उर्जा म्हणजे वाऱ्याच्या गतीतून निर्माण होणारी उर्जा. जलउर्जा म्हणजे पाण्याच्या प्रवाहातून मिळणारी उर्जा. जे दीर्घकाळापासून मानवाने उर्जा मिळविण्यासाठी वापरलेले उर्जेचे पारंपारिक स्त्रोत म्हणजे कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, लाकूड, शेणपीक अवशेष इत्यादी. औद्योगिक क्रांतीपासून कोळशाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असून वीजनिर्मिती, उद्योगधंदे, रेल्वेसाठी केला जातो. पेट्रोलियमचा वापर हा वाहतूक, शेती, कारखाने यासाठी केला जातो. गॅस स्टोव्ह, गॅस टर्बाईन, सीएनजी वाहनांसाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. ग्रामीण व आदिवासी भागात स्वयंपाकासाठी लाकूड वापरले जात असून जंगलतोडीमुळे पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होत आहे, तसेच पारंपारिक उर्जा स्त्रोताचा साठा हा मर्यादित असून त्यामुळे प्रदुषण निर्माण हाते तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अपारंपारिक उर्जा स्त्रोत हे वापरल्यानंतर वातावरणात कार्बन सोडत नाही. अपारंपारिक उर्जाप्रकारात सौर उर्जा, वाऱ्याची उर्जा, सागरी उर्जा, भूतलातील उष्णता, बायोमास उर्जा यांचा समावेश होते. सौर उर्जा ही सूर्यप्रकाशाचा वापर करुन वीज निर्माण केली जाते, यात सोलर पॅनल्स, सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर वापरले जातात. वाऱ्याची उर्जा वाऱ्याच्या वेगाने टर्बाईन फिरवून वीज निर्माण केली जाते, तसेच मोठ्या पवनचक्क्या उभारुन वीजनिर्मिती केली जाते. समुद्राची उर्जा ही समुद्राच्या भरती ओहोटीपासून किंवा लाटांपासून मिळविली जाते. भूतलातील उष्णता ही पृथ्वीच्या आतील उष्णतेचा वापर करुन वीजनिर्मिती केली जाते. शेती अवशेष, जनावरांचे शेण, घरगुती कचरा आदीपासून बायोगॅस व वीजनिर्मिती केली जाते. अपारंपारिक उर्जा स्त्रोतापासून निर्माण होणारी उर्जा ही अक्षय असून ती संपत नाही, त्याचे प्रदुषण होत नाही, दीर्घकाळीसाठी ती वापरली जात असल्याचे शरद पुस्तके यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सौरउष्णतेवर आधारित विविध प्रक्रिया, घनकचरा , सांडपाण्यापासून वीजनिर्मितीचे महत्व पटवून दिले. व्याख्यानाच्या अखेरीस श्रोत्यांनी प्रश्न विचारले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘पर्यावण वाचवा, वसुंधरा सजवा’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करणारी चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्‌येकांनी जनजागृती करण्याचा निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले.

राज्यभरात, २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आणि ०१ मे हा महाराष्ट्र दिन यांचे औचित्य साधून या काळात वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ‘आमचा ग्रह, आमची पृथ्वी’ ही यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे. त्या अनुषंगाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी ठाणे महापालिका व रोटरी क्लबच्या माध्यमातून शहरातील गांवदेवी परिसरात कापडी पिशव्यांचे सशुल्क व्हेंडिग मशीन उपलब्ध करण्यात आले असून नागरिकांनी याचा करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मकरंद जोशी यांनी केले.